

*बुधवार दिनांक :- २१/०५/२०२५* *गोंदिया जिल्हा पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांचे संयुक्त विद्यमाने* *जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नेमबाजी (शुटींग) खेळप्रकार व इतर विविध विषयांवर मार्गदर्शन…* 🔹 गोंदिया जिल्हयातील आदिवासी युवक-युवतीं यांच्या कलागुणांना वाव देवून त्यांना नवीन कौशल्य शिकविणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, समुदायाची भावना विकसीत करणे, तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक आवड जपता यावी व स्वतःचा विकास करता यावा यासाठी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतुन व श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, कॅम्प देवरी यांचे मार्गदर्शनाखाली “पोलीस दादालोरा खिडकी योजना” अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस दल व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय गोंदिया येथे दिनांक- १९/०५/२०२५ रोजी विद्यार्थ्यांना नेमबाजी (शुटींग) खेळप्रकार, पोलीस विभागाची कार्यपद्धती व इतर विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी १ दिवसीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर भेटीकरीता आलेल्या ३९ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमबाजी (शुटींग) खेळाबद्दल रुची निर्माण व्हावी, याकरीता विद्यार्थ्यांना नेमबाजी (शुटींग) खेळाबद्दल मार्गदर्शन करुन प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक सराव घेण्यात आले… तसेच यादरम्यान पोलीस विभागातील तज्ञ अधिकारी/अंमलदार यांनी विद्यार्थ्यांना पोलीस दलाचे आधुनिकीकरण, हत्यार, दारुगोळा, विविध आधुनिक शस्त्रास्त्रे, त्याचप्रमाणे श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्या कार्यपद्धती बद्दल, पोलीस विभागामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कशाप्रकारे गुन्हयाची उकल करुन आरोपीतांचा शोध घेण्यात येतो याबद्दल सविस्तर माहिती दिली. सदर उपक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक गोंदिया, मा.श्री. गोरख भामरे, यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेवुन त्यांना उज्ज्वल भवितव्याबद्दल मार्गदर्शन केले. उपरोक्त उपक्रमाबरोबरच गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि आदिवासी कल्याण समिती, रोटरी इंटरनॅशनल जिल्हा ३०३०- नागपूर, जिवन आधार बहुउद्देशीय संस्था, तसेच जिंजर हॉटेल, गोंदिया, यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थान (MGIRI) वर्धा येथे गोंदिया जिल्हयातील पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र पिपरखारी येथील एकुण १० प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक १६/०४/२०२५ ते १६/०५/२०२५ पर्यंत १ महिन्याचे बांबु क्राफ्ट प्रशिक्षणाकरीता पाठविण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना देखील दिनांक- १९/०५/२०२५ रोजी पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे पाचारण करुन त्यांनी प्रशिक्षणादरम्यान तयार केलेल्या बांबु क्राफ्ट च्या विविध वस्तुंची प्रदर्शनी भरविण्यात आली. सदर उपक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थ्यांना भेट देवून त्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. उपरोक्त दोन्ही उपक्रम हे पोलीस मुख्यालय, कारंजा, गोंदिया येथील प्रेरणा सभागृहात संपन्न झाले… सदर कार्यक्रमात श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. उमेश काशीद, प्रकल्प अधिकारी, आदिवासी प्रकल्प विभाग देवरी, श्रीमती सरीता रहांगडाले, व्यवस्थापक, जिंजर हॉटेल, गोंदिया, तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील अधिकारी / अंमलदार व जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील प्रशिक्षणार्थी हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्रीकांत हत्तीमारे, पोलीस उप-निरीक्षक, गोंदिया यांनी केले.
रिपोर्ट : जुबेर शेख
