• आचारसंहितेचे पालन करा आमगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 60 हजार 785 मतदारदेवरी, दि.16 : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यासह आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. बळाचा प्रयोग (मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाने असून यावर मात करण्यासाठी आयोगाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 ऑक्टोबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कवीता गायकवाड बोलत होते. यावेळी निवडणूक अधिकारी, आमगाव व सालेकसा तालुक्याचे तहसीलदार, देवरी नायब तहसीलदार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उपविभागीय अधिकारी गायकवाड म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेवून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची घोषणा केली असून काल दि. 15 ऑक्टोबंर पासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे. सदर अधिसूचनेद्वारे 22 ऑक्टोबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणे, 29 ऑक्टोबर- नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत, 30 ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्राची छाननी, 4 नोव्हेंबर- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.सोशल मिडिया, पेड न्यूज व फेक न्यूजवर आयोगाची व प्रशासनाची करडी नजर असणार असून फेक न्यूज पसरविणाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल कडक कारवाई करेल. नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त होतांना काळजी घ्यावी तसेच चुकीचे मेसेज पोस्ट करु नये किंवा फॉरवर्ड करु नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी यानीं केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी विधानसभा क्षेत्रात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
रिपोर्ट – जुबेर शेख